. नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पंतप्रधान , राष्ट्रपतींसह व्हीव्हीआयपींच्या प्रवासासाठी २ विशेष विमानांच्या खरेदीवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मोदी यांना केवळ आपल्या प्रतिमेची चिंता आहे, सैनिकांची नाही, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांनी स्वत:साठी ८ हजार ४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले, मात्र या पैशांमध्ये सियाचीन आणि लडाखमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसाठी गरम कपडे आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी केल्या जाऊ शकत होत्या, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
मात्र, हे विमान केवळ पंतप्रधानांसाठी नसून या विमानांच्या खरेदीची प्रक्रिया देखील काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या काळात सुरू झाली होती, असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे आहे.
राहुल गांधी यांनी सियाचीन आणि लडाख येथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी गरम कपडे आणि आवश्यक ते सामान खरेदी करण्याशी संबंधित एका बातमीचा स्क्रिनशॉट शेयर करत पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी लिहिले, ‘पंतप्रधानांनी स्वत:साठी ८,४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले. एवढ्या रकमेमध्ये सियाचीन आणि लडाख सीमेवर तैनात असलेल्या आमच्या जवानांसाठी कितीतरी आवश्यक गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकत होत्या- गरम कपडे: ३०,००,०००, जॅकेट, हातमोजे: ६०,००,०००, बूट: ६७,२०,०००, ऑक्सिजन सिलेंडर: १६,८०,०००. पंतप्रधानांना केवळ आपल्या प्रतिमेची चिंता आहे, सैनिकांची नाही.’
राहुल गांधी यांनी मंगळवारी देखील या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी ८ हजार कोटी रुपये खर्चून विशेष विमाने खरेदी केली आहेत. दुसरीकडे आमच्या सीमांवर चीन उभा आहे आणि आमचे सैनिक सीमांवर संरक्षणासाठी भीषण थंडीचा सामना करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले होते.