वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून सध्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. . मात्र, ट्रम्प यांनी रविवारी सायंकाळी अचानक बाहेर येऊन सर्मथकांचे आभार मानले. कोरोनाच्या या संकटातही संधी साधण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एक महिन्यापेक्षाही कमी दिवस असताना त्यांच्या प्रचाराबाबत काळजी व्यक्त करण्यात येत होती व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी काही वेळेसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प रुग्णालयातून बाहेर आले. कारमध्ये बसून त्यांनी समर्थकांना अभिवादन केले. समर्थकांना अभिवादन केल्यानंतर ते पुन्हा एकदा रुग्णालयात परतले.
त्याआधी ट्रम्प यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपण समर्थकांना भेटणार असल्याचे संकेत दिले होते. मी कोविड-१९ बद्दल बरेच काही शिकलो असल्याचे त्यांनी म्हटले. प्रकृतीत होत असलेली सुधारणा दाखवण्यासाठी ट्रम्प रुग्णालयाबाहेर आल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांच्या या डावामुळे विरोधी डेमोक्रेट पक्षही हैराण झाला आहे.
ट्रम्प यांनी अचानक रुग्णालयाबाहेर येणे चुकीचे असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाचे डॉक्टर जेम्स फिलीप यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्षांसाठी असलेली एसयुव्ही कार ही फक्त बुलेटप्रूफ नाही. केमिकल हल्ल्याचा परिणाम होऊ नये यासाठीही सील केलेली आहे. त्यामुळे या कारमध्ये कोविड-१९ संसर्गाचा अधिक धोका आहे. ट्रम्प यांनी रुग्णालयाबाहेर येणे हे बेजबाबदारपणा असल्याचीही टीका त्यांनी केली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ट्रम्प यांना व्हाइट हाउसमधून रुग्णालयात दाखल करताना त्यांच्यासाठी ४८ तास महत्त्वाचे असल्याचे म्हटले गेले होते. मात्र, रुग्णालयात ट्रम्प यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.