लखनऊ : वृत्तसंस्था । हाथरस सामूहिक बलात्कार गुन्ह्यातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि महासचिव प्रियांका गांधी यांना यमुना एक्सप्रेस-वेवर रोखण्यात आलं. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पायीच हाथरसकडे जाण्यासाठी निघाले आहेत. ज्या ठिकाणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना रोखण्यात आलंय ते हाथरसपासून जवळपास १४० किलोमीटर दूर आहे.
काँग्रेसचे मीडिया संयोजक ललन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबीयांची भेट करण्यासाठी निघाले असताना रस्त्यातच ग्रेटर नोएडा पोलिसांच्या ताफ्यानं परी चौक भागात त्यांना रोखलं.
दरम्यान प्रियांका गाधी यांनी हाथरस पीडितेच्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.
गुरुवारी सकाळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित कुटुंबीयांची भेट घेणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले तीन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं सांगण्यात आलं. कोरोनाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हाथरसमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत कलम १४४ लावण्यात आल्याचं प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं. जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत मीडियालाही हाथरसपासून जवळपास दीड किलोमीटर अंतरावरच अडवण्यात आलंय.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हाथरस गँगरेप पीडितेला न्याय देण्याची मागणी करत डीएनडी फ्लायवेवर आंदोलन केलं. यूपीच्या योगी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हाथरसमध्येही जिल्हा प्रशासनानं जिल्ह्याच्या सीमेवरच राजकीय नेत्यांसहीत मीडियाला रोखण्याची तयारी केलेली दिसतेय.