यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मालोद येथे मयत पॉझिटीव्ह कुटुंबातील तीन नवीन कोरोना बाधीत रूग्णांना क्वॉरंटाईन करण्यावरून आज वाद निर्माण झाला. तथापि, पोलिसांनी वेळीस हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील मालोद या गावातील मरण पावलेल्या एका कोरोना पॉझीटीव्ह व्याक्तीच्या कुटुंबातील तिन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना क्वॉरंटाईन करण्यास गेलेले आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत यांच्यात वाद झाल्याचे वृत्त असुन वेळीच पोलीसांनी मध्यस्थी केल्याने अखेर त्या कोरोना बाधीतांना क्वारेंटाइन करण्यात आल्याने गावातील वाद निवळला.
यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यात किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्रा अंतर्गत एकुण १७२कोरोना बाधीत रुग्ण मिळुन आले असुन यातील ३७ रुग्णांवर कोवीड कक्षात उपचार करण्यात येत आहेत. याच कार्यक्षेत्रात येणार्या मालोद या गावात एकुण पाच रुग्ण कोरोना बाधित मिळुन आले असुन यातील एका कोरोना बाधीत व्यक्तिचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. तर याच व्यक्तिच्या कुटुंबातील तिन जण हे आज पॉझीटीव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
या पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांना क्वारेंटाइन करण्यासाठी ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी यांचे पथक त्यांच्या निवासस्थानी गेल्याने पॉझीटीव्ह आलेल्या रुग्णांच्या कुटुंबांनी क्वॉरंटाईन होण्यास नकार दिल्याने या ठिकाणी रुग्णांचे कुटुंब आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक व वाद झाल्याचे वृत आहे.
दरम्यान गावातील होणार्या गोंधळाची परिस्थिती पाहुन गावातील पोलीस पाटील तडवी यांनी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्याशी दुरध्वनी व्दारे संपर्क साधुन मालोद गावातीत परिस्थितीची माहिती कळविली. धनवडे यांनी तात्काळ दक्षता घेवुन पोलीस कर्मचारी सुनिल तायडे व विकास सोनवणे यांना मालोद गावात पाठविले. त्यांनी हस्तक्षेप केल्याने संघर्ष टळला असून तिन्ही रूग्ण सायंकाळी क्वॉरंटाईन झाले आहेत.