भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिंपरखेड येथे बँक ऑफ बडोदामध्ये चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तिजोरी फोडण्यात चोरटे अयशस्वी झाले. यामुळे तिजोरीतील आठ लाख रुपयांवर रक्कम सुरक्षित राहिली.
याबाबत माहिती अशी की, पिंपरखेड येथे बडोदा बँकेची शाखा गावाबाहेर नवीन प्लॉट एरियात आहे. आज पहाटे पावणेचारच्या सुमारास चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सुरुवातीला सायरनच्या वायर कापल्या, नंतर आतील सीसीटीव्ही बॉक्स हार्ड डिस्कच्या वायर तोडल्या, तसेच ऑनलाईन सर्व्हरच्याही संपूर्ण वायर कापल्याचे दिसते. येथूनच चोरटे पुढे तिजोरीपर्यंत पोहोचले. मुख्य तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचे दिसते. परंतु चोरट्यांकडून तिजोरी काही फुटलेली नाही. या तिजोरीत आठ लाख १९ हजार ४९३ रुपये रोख रक्कम होती. ती सर्व सुरक्षित राहिली आहे. या बँकेत सुरक्षा रक्षक नाही. या बँकेत एकूण पाच कर्मचारी कार्यरत आहेत. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.