औरंगाबाद वृत्तसंस्था । मुंबई विकास प्राधिकरणानंतर आता औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्याने मराठवाड्यातील जनतेला ऑनलाईन पध्दतीने शुभेच्छा देताना ते बोलत होते.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा सिध्दार्थ उद्यानात पार पडला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मुक्तिसंग्राम दिना निमित्त मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. ‘मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे, तशीच ती अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांची देखील भूमी आहे.
अन्याय मोडून काढून स्वातंत्र्य मिळवणे हे मराठवाड्याचे वैशिष्ट्य आहे. मुक्तिसंग्रामसाठी अबालवृध्दांनी योगदान दिले आहे. आपल्या जिवाची पर्वा न करता अनेक जण या मुक्ती लढ्यात सहभागी झाले. त्या सर्वांना मी वंदन करतो, असा उल्लेख त्यांनी केला. मुक्ती लढ्यात सहभागी झालेल्यांचा वारसा सांगणारी आजची पिढी आहे. आपले मराठवाड्याशी, औरंगाबादशी वेगळे नाते आहे, भावनात्मक नात्याची आपली जवळीक आहे असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नामोल्लेख करून केला.
हैदराबाद मुक्तिसंग्रामचा लढा विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ द्यायचा नाही, मुक्ती लढ्याचा इतिहास पुढच्या पिढीला सांगायचा आहे आणि त्यासाठी सिध्दार्थ उद्यानाच्या परिसरात मुक्तिसंग्राम संग्रहालय उभारले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडा चिवट आणि जिद्दी आहे असे सांगताना ते म्हणाले, विकासाच्या दिशेने मराठवाड्याची वाटचाल सुरू आहे, पण त्यात काही अडचणी आहेत. समृध्दी महामार्ग झाल्यावर मराठवाडा समृध्द होईल असा उल्लेख करून ते म्हणाले, मुंबई विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन केले जाईल यासाठी पालकमंत्री यांनी लक्ष घालावे अश्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.