नवी दिल्ली । एकीकडे देश कोरोनाशी झुंजत असतांना दुसरीकडे केंद्र सरकारने कंपन्यांचा ‘सेल’ लावला असल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत केली.
संजय राऊत यांनी आज राज्यसभेत बोलतंना केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशाची आर्थिक स्थिती खूप गंभीर आहे. अशा स्थितीत देशाचा जीडीपी आणि रिझर्व्ह बँक कंगाल झाली आहे. त्यातच एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि बरंच काही सरकारनं बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलं आहे. बाजारात विक्रीसाठी मोठा सेल लागला आहे. आता या सेलमध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टदेखील आणले असल्याची टीका त्यांनी केली. सरकार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट खासगी कंपनीकडे देण्याचा विचार करत आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जगातील सर्वात मोठं बंदर आहे. त्यातून भारत सरकारला ३० टक्क्यांपेक्षा अधिक नफा मिळतो. असं महत्त्वपूर्ण बंदर खासगी कंपनीच्या हाती देणं राष्ट्रीय सपत्तीचं मोठं नुकसान असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.
दरम्यान, याप्रसंगी त्यांनी कोरोनावरही भाष्य केले. ते म्हणाले की, माझी आई आणि भावालाही करोनाचा संसर्ग झाला होता. महाराष्ट्रात अनेक लोक करोनातून बरे होत आहेत. आज धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. बृह्नमुंबई महापालिकेनं केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतुक केलं आहे. काल काही सदस्यांनी महाराष्ट्रावर टीका केली, त्यामुळे मी हे सत्य सांगतोय. मला सदस्यांना विचारायचं की असंख्य लोक करोनातून बरे कसे झाले? क्या लोग भाभीजी के पापड खा करके ठीक हो गये? ही राजकीय लढाई नाहीये, तर लोकांचे जीव वाचवण्याची लढाई आहे, अशा शब्दात राऊत यांनी सरकारवर टीका केली.