मुंबई वृत्तसंस्था । मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: महापौर पेडणेकर यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावं असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले.
किशोरी पेडणेकर या लॉकडाऊनपासून अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत. स्वत: रस्त्यावर उतरुन त्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी, कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन पाहणी, गणवेश परिधान करुन नर्सना प्रोत्साहन, अशा विविध रुपात किशोरी पेडणेकर पाहायला मिळाल्या.
यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्याने, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. इतके दिवस कोरोनाचा मुकाबला केल्यानंतर, आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.