जळगाव । पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मला व्हिलन म्हणून सादर केले गेले असून हे नेमके कुणी केले याची आपल्याला माहिती असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले आहे. आज दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. यात ते म्हणाले की, मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, मी या पदाच्या शर्यतीतही होतो. मात्र, माझ्यावर आरोप करुन मला बाजुला करण्यात आलं. पंकजा मुंढे या मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हटल्या, त्यांनाही पद्धतशीरपणे हटवलं गेलं. विनोद तावडेंच्या बाबतीतही तेच घडलं. वरिष्ठांकडे माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मला व्हिलन करण्यात आलं. वरिष्ठ पातळीवरील माझेही काही सहकारी मित्र, नेतेमंडळी मला सांगतातच की, आणि हे कुणी केलं सर्वांना माहितीय, असे खडसेंनी म्हटले.
वरिष्ठांकडे देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याबद्दल जे काही वातावरण निर्माण केलं, मी भेटतो, मी बोलतो. मला वरिष्ठ नेते मंडळी सांगतात, माझ्याबाबतीत इतकं वाईट मत करुन ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही चांगली व्यक्ती आहे, हे आता वरचे लोकं विसरले आहेत, नाथाभाऊ म्हणजे व्हिलन, असे म्हणत खडसेंनी फडणवीस यांच्यावर प्रहार केला.