जळगाव प्रतिनिधी । ग. स. सोसायटीचे सभासद रावसाहेब मांगो पाटील व योगेश जगन्नाथ सनेर यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांनी फेटाळल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
रावसाहेब मांगो पाटील व योगेश जगन्नाथ सनेर यांना अपात्र करावे, यासाठी संचालक मंडळाने २५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या जनरल सभेत ठराव केला होता. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड यांचेकडे दोघांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी पाठवण्यात आला होता.
ग.स.चे सभासद रावसाहेब पाटील व योगेश सनेर यांचेविरुद्ध ग.स.संचालक मंडळाने सहकार कायदा १९६०चे कलम ३५ व १९६१ चे नियम २८ व २९ अन्वये २५ ऑगस्ट २०१९ रोजी जनरल सभेत दोघांचे सभासदत्व रद्द करण्याचा विषय अजेंड्यावर घेतला. यानुसार ठराव करून तसा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवला.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांकडील २८ जानेवारी २०२० रोजीच निकाल दिला होता. मात्र, तो न मिळाल्याने सनेर यांनी १५ फेब्रुवारी रोजी माहिती अधिकारात माहिती मागितली. तरीही माहिती न मिळाल्याने सनेर अपिलात गेले. तेथे ८ जुलै रोजी अपील मंजूर झाले. एक महिन्याच्या आत मागितलेला निकाल व कागदपत्र देण्याचे आदेशित होते. मात्र, तरीदेखील शेवटी जानेवारी २०२० चा निकाल संबधित सभासदांना २ सप्टेंबर २०२० रोजी दिला गेला.
उपनिबंधकांनी जानेवारीत दिलेला निकाल हा सप्टेंबरमध्ये मिळाल्याने सहकार क्षेत्रात या प्रकरणाची एकच चर्चा आहे.