नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री बैठकीत जीएसटी नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने आपण नुकसान भरपाई देऊ शकत नसल्याचं सांगणं म्हणजे विश्वासघात आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील सहभागी झाले होते. या बैठकीत काँग्रेसचे चार आणि तर इतर पक्षांचे तीन मुख्यमंत्री सहभागी झाले.
सोनिया गांधींनी बैठकीत बोलताना सांगितलं की, “११ ऑगस्ट रोजी झालेल्या अर्थ स्थायी समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने यावर्षी आपल्याला १४ टक्के जीएसटी नुकसान भरपाई देणं शक्य नसल्याचं सांगितलं. हा नकार म्हणजे मोदी सरकारने दिलेला विश्वासघात आहेत,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.
पुढे बोलताना त्यांनी सागितलं की, “राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित घोषणांमुळे आपल्याला चिंता वाटली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या इतर समस्या आणि परीक्षा यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असून बेजबाबदारपणे हाताळलं जात आहे”.
सर्व राज्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी विनंती यावेळी ममता बॅनर्जी यांनी केली. “माझी विनंती आहे की, सर्वांनी एकत्र येऊन सुप्रीम कोर्टात जाऊया आणि जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत जेईई आणि आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करावी,” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.