मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीतील वाढीव वीज बिलाने त्रस्त झालेल्यांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. वाढीव वीज बिलात सुट देण्याचा करण्याचा प्रस्ताव लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे.
उर्जा खाते लवकरच राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावानुसार, राज्यातील सर्वच वीज ग्राहकांचा यावर्षीच्या एप्रिल, मे, जून या महिन्यातील वीज वापर आणि याच महिन्यांसाठी २०१९ साली केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. २०१९ साली जेवढा वीज वापर केला असेल तेवढ्याच वापराचे या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात वीज बिल ग्राहकांना भरायचे आहे. त्यावरील वीज वापराचा भार राज्य सरकार उचलणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत राज्य सरकार पूर्णपणे भरणार आहे.
म्हणजे कुण्या ग्राहकाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ५० युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी १०० युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर त्याला ५० युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या ५० युनिटचे बिल राज्य सरकार भरणार आहे. याच पद्धतीने जर वीज वापर १०१ ते ३०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा ५० टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. तर वीज वापर ३०१ ते ५०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा २५ टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे.
राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू नसणार आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे.