फरीदाबाद । बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याचा हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला असून या संदर्भात एका शार्प शुटरला अटक करण्यात आली आहे.
फरीदाबाद पोलिसांनी भिवानी जिल्ह्यातील असलेल्या २७ वर्षीय राहुल संगा उर्फ बाबा या शार्प शुटरला अटक केली आहे. फरीदाबाद येथील एका स्थानिक व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वरवर जप्त करण्यात आलं आहे. त्याच्या चौकशीत पोलिसांना अतिशय धक्कादायक माहिती मिळाली आहे. यानुसार त्याने सलमान खानला ठार करण्याचा कट आखला होता. यासाठी त्याने रेकी देखील केली होती.
राहुल यावर्षी जानेवारी महिन्यात मुंबईच्या वांद्र्यात गेला होता, जिथे सलमान खानचं घर आहे. राजस्थानच्या जेलमध्ये असेलल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या निर्देशआनुसार राहुलनेसलमान खानची आणि हालचालांची तीन दिवस रेकी केली होती. काळवीट शिकारी प्रकरणात सुटका झालेला सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर असल्याची माहिती आधीच समोर आली आहे. यासाठी त्याने मागील वर्षी एका गँगस्टरलाही सलमानच्या मागावर पाठवलं होतं. यानंतर आता राहूलला अटक केल्यानंतर याबाबत नव्याने कट रचल्याचे दिसून आले आहे.
याआधी जून महिन्यात हरियाणा पोलिसांनी शार्पशूटर संपत नेहराला हैदराबादमधून अटक केली होती. सलमान खानच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तो मुंबईला गेला होता. यानंतर आता नवीन शार्प शुटरला केलेल्या अटकेमुळे सलमान हा गुन्हेगारांच्या निशाण्यावर असल्याचे अधोरेखीत झाले आहे.