नवी दिल्ली वृत्तसंस्था । इन्फोसिसचे प्रमुख एन.आर. नारायणमूर्ती यांनी हल्लीच केलेल्या एका विधानाचा आधार घेऊन राहुल गांधींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशाचा आर्थिक विकासाचा दर यावर्षी स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात खराब स्थितीत असेल, असे विधान नारायण मूर्ती यांनी केले होते. त्यावरून ‘मोदी है तो मुमकीन है’, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
कोरोना विषाणू आणि कोरोनाच्या संसर्गात पायबंद घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाच्या विकासदरात मोठी घट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नारायण मूर्ती यांनी देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत विधान केले होते. कोरोनामुळे यावर्षी देशाचा आर्थिक विकास दर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी राहण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर रुळावर आणणे गरजेचे आहे. तसेच देशाच्या जीडीपीमध्येही स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी घसरण दिसून येऊ शकते, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले होते.
देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यावसायिकाला पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी व्यवस्था देशात निर्माण व्हावी, अशी अपेक्षा नारायण मूर्ती यांनी व्यक्त केली. नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, भारताच्या जीडीपीमध्ये किमान पाच टक्के आकुंचन होण्याचा अंदाज आहे. जागतिक जीडीपीमध्ये घट झाली आहे. जगभरातील व्यापार अडचणीत आहे. जागतिक जीडीपीमध्ये पाच ते दहा टक्के घट होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.