मोठे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा- अनिकेत सचान ( व्हिडीओ)

0
41


भुसावळ प्रतिनिधी । इंटरनेटने आता सर्व भेद मिटवले असून युपीएससी परिक्षा ही देखील अगदी ग्रामीण भागातील तरूणांच्या अवाक्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पहावे आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी युपीएससी मध्ये यश संपादन केलेल्या भुसावळच्या अनिकेत सचान याने दिला. तो लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होता.

युपीएससी परिक्षेत यश संपादन करण्यासाठी बहुतेक उमेदवारांना अनेकदा प्रयत्न करावे लागतात. अर्थात, पहिल्याच फटक्यात यश मिळवणार्‍यांची संख्या ही तशी कमी असते. यातच वयाच्या फक्त बावीसाव्या वर्षी ही परिक्षा उत्तीर्ण करणे हा तोंडचा खेळ नव्हे. मात्र हा पराक्रम भुसावळ येथील पंधरा बंगला भागातील रहिवासी असणार्‍या अनिकेत विनयकुमार सचान या तरूणाने करून दाखविला आहे. अनिकेत हा बालपणापासूनच अतिशय कुशाग्र बुध्दीचा. त्याचे वडिल भुसावळ रेल्वेत मुख्य तिकिट तपासणीस असून आई ही गृहिणी आहे. खर तर त्याची आई ही उच्चशिक्षीत असून त्यांनी काही काळ शहरातील सेंट अलॉयसिअय विद्यालयात अध्यापनाचे कार्य केले आहे. तथापि, आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता यावे यासाठी त्यांनी हे काम सोडून मुलांना घरी शिक्षणात पारंगत करण्याचे काम केले. अनिकेतचे बारावी पर्यंतचे शिक्षण भुसावळातील केंद्रीय विद्यालयात झाले. बारावीच्या परिक्षेतील उज्ज्वल यशासह जेईई परिक्षेत उच्च रँकींग मिळवून त्याने २०१५ साली वाराणसी येथील आयआयटीत इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश मिळवला. गेल्या वर्षी अर्थात २०१९ मध्ये पदवी मिळत असतांनाच त्याने युपीएससी परिक्षा दिली. आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने देशातून २८५ वी रँक संपादन केली. त्याला आयएएस संवर्ग मिळण्याची शक्यता आहे. खरं तर पदवी मिळाल्या बरोबर अनिकेतला टाटा स्टीलमध्ये चांगली नोकरी मिळाली असतांनाही त्याने याच्या मोहात न पडता युपीएससीवर लक्ष केंद्रीत करून यात यश मिळविले.

दरम्यान, गत वर्षी पदवी मिळवल्यानंतर त्याने कोणताही क्लास न लावता घरीच अभ्यास करून युपीएससीत यश मिळविले ही बाब अतिशय लक्षणीय आहे. त्याने काही ऑनलाईन अभ्यासक्रमांचा अतिशय समर्पक वापर केला. दररोज नियमितपणे आठ-दहा तास अभ्यास करून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याने परिक्षेसाठी आवश्यक असणार्‍या विषयांचा अभ्यास तर कसून केलाच. पण मुलाखतीसाठी त्याला त्याच्यातच असणार्‍या पैलूंचा उपयोग झाला. अनिकेतला हिंदी साहित्य तसेच वादविवाद अर्थात डिबेटींगची आवड होती. यामुळे मुलाखतीत हिंदी साहित्याशी आलेला प्रश्‍न आणि गत पाच वर्षातील सरकारची काम आणि त्रुटी याबाबत दोन्ही बाजू त्याला प्रखरपणे मांडता आल्या. याचा पर्यायाने त्याला लाभ झाला. तसेच राज्यसभा टिव्हीवरील डिबेट, इंडियन एक्सप्रेस, ओआरएफ पेज आदींचाही आपल्याला लाभ झाल्याचे त्याने नमूद केले.

तर नवीन परिक्षार्थींना त्याने काही मूलमंत्रदेखील दिले आहे. यात त्याने म्हटले की, आपण स्वप्न पाहत असाल तर ते मोठे पहा अन् त्याच्या पूर्ततेसाठी पूर्ण प्रयत्न करा. अभ्यासाठी एकाच स्त्रोताचा वापर करावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत: नोटस् काढाव्यात असे त्याने सुचविले आहे. इंटरनेटने सर्व भेद मिटवले असून आपल्याकडे कोणतेही डिस्प्लेयुक्त उपकरण, याच्या जोडीला इंटरनेट आणि इच्छाशक्ती असेल तर यश मिळवणे कठीण नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. आपले आई-वडिल आणि बहिण यांचेही आपल्या यशात मोठे योगदान असल्याचे त्याने आवर्जून नमूद केले आहे. अनिकेतचे वडील विनयकुमार सचान यांना आपला मुलगा हा नक्कीच यश मिळवेल असा विश्‍वास होता. तर आईला देखील याचा विश्‍वास होता. त्याची बहिण आयुषी ही एम्समधून वैद्यकीय शिक्षण घेत असून तिलाही आपल्या भावाच्या देदीप्यमान यशाचा अभिमान वाटत आहे.

वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी युपीएससीत यश मिळवणार्‍या भुसावळकर अनिकेत सचान याला पुढील वाटचालीसाठी लाईव्ह ट्रेंडस न्यूजतर्फे शुभेच्छा.

खालील व्हिडीओत पहा अनिकेत सचानची विशेष मुलाखत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/297325771514001/