बेरुत (वृत्तसंस्था) लेबनानची राजधानी असलेले बेरुत शहर महाभयंकर स्फोटांमुळे हादरले आहे. बेरुत शहरात दोन महाभयंकर स्फोट झाले. यात ७३ जणांचा मृत्यू, ३७०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भयंकर होता की गाड्यांच्या काचा, इमारतींच्या खिडक्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला.
लेबनानची राजधानी बेरूतमध्ये मंगळवारी दुपारी किनाऱ्यावर उभ्या एका जहाजात मोठा स्फोट झाला. हे जहाज फटाक्यांनी भरलेले होते. स्फोट इतका भीषण होता की १० किमीच्या परिघात असलेल्या घरांचे नुकसान झाले. या स्फोटामुळे कार तिसऱ्या मजल्यापर्यंत उडाल्या होत्या. इमारती एका क्षणात कोसळल्या. मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास मोठा आवाज झाला. हा आवाज कशामुळे झाला हे समजण्यापूर्वीच एक स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटानंतर दुसरा स्फोट झाला. जवळपास १५ मिनिटात एकमागोमाग एक दोन स्फोट झाले. याचा आवाज एखाद्या बॉम्बस्फोटप्रमाणे होता. या स्फोटामुळे जमिनीला तडे गेले. गगनचुंबी इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.