कोईमतूर (वृत्तसंस्था)। सुमारे ६० तास पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर मायदेशी परतलेले हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी काल पुन्हा एकदा उड्डाण करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर आज हवाईदल प्रमुख बी.एस. धनोआ यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्यावर ते म्हणाले की, अभिनंदन यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवर ते अवलंबून आहे. धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राइकवर सविस्तर भाष्य केले.
यावेळी त्यांना अभिनंदन पुन्हा विमान उड्डाण कधी करणार ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘ते पुन्हा विमान उड्डाण करू शकणार की नाही ? हे त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीवरून ठरेल. अभिनंदन यांनी त्यांच्या विमानातून उडी घेतली. यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जात आहेत. ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यावरच पुन्हा कॉकपिटमध्ये परततील,’ असे धनोआ यांनी सांगितले. दरम्यान अभिनंदन यांनीही कालच आपणास लवकरच पुन्हा विमान उडवायचे आहे, अशी इच्छा आपल्या वरिष्ठांकडे बोलून दाखवल्याची माहिती कळली आहे.