जळगाव प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील एका दूध डेअरीच्या ओट्यावर बसलेल्या बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग करणाऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालिका ही शुक्रवारी १८ रात्री ८.३० वाजेच्या सुमारास दूध डेअरीच्या ओट्यावर बसलेली होती. बाजूला एक अनोळखी इसम हा बसलेला होता. त्याने त्या बालिकेचा विनयभंग केला. हा प्रकार छावा मराठा युवा महासंघाचे भैय्या पाटील व त्यांच्या मित्रांना दिसला. त्यांनी त्या इसमाला चोप दिला. दुसऱ्या दिवशी शनिवारी पिडित बालिकेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीसांनी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपी हा पाळधी ता.धरणगाव बसस्थानकाजवळून अटक केली. हर्षवर्धन सुदाम पवार (वय-२०) रा. गेंदालाल मील, जळगाव असे संशयित आरोपीचे नाव आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अक्रम शेख, सुधिर साळवे, गणेश शिरसाळे, तेजस मराठे, सचिन वाघ यांनी कारवाई करत दुपारी ३ वाजेच्या सुमारास अटक केली. संशयित आरोपी हर्षवर्धन पवार यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.