जळगाव, प्रतिनिधी । राज्यसभेच्य़ा नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळ्याप्रसंगी भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली. त्यावरून राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला होता. याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष महानगर अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पोस्टरला काळे फासण्यात आले. याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आदी घोषणा देण्यात आल्या. उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेतल्यानंतर राज्यसभा सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयन राजेंना घोषणा देण्यास अटकाव केला होता, याचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचा महानगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन निवडणूक लढवितात परंतु, शिवाजी महाराजांचे नाव घेतलेले त्यांना चालत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाच्या या प्रवृत्तीचा निषेध करत असल्याचे त्यांनी पुढे स्पष्ट केले की, उदयनराजे भोसले हे तुमच्या पक्षाचे आहेत, पण निषेध आम्ही करत आहोत. तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही देखील पुढे, या असे त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन केले. यावेळी महानगराध्यक्ष अभिजित पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, युवा जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ऍड. कुणाल पवार, किरण वाघ, ममता तडवी, हर्षवर्धन खैरनार, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/287540805688244/