जळगाव प्रतिनिधी । कुलूपबंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड व दागिने असा पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील आदर्शनगर परिसरात रवींद्र नगरमध्ये घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल सत्यनारायण पिंकुरवार (वय-२९) या महिला 46/ब रवींद्र नगर याठिकाणी वास्तव्यास आहेत. कोमल या वनविभागाच्या एरंडोल येथील कार्यालयात परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती वर्धा येथे नोकरीला आहेत. वडील जळगावला आल्याने घराच्या दरवाजाला कुलूप लावून कोमल वडिलांसोबत २१ जून २०२० रोजी माहेरी परभणी येथे गेल्या. बंद घर असल्याची खात्री झाल्यानंतर चोरट्यानी दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.हाती लागलेला मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
शेजाऱ्याने दिली माहिती
दरम्यान, 13 जुलै रोजी सकाळी 06 वाजेच्या सुमारास घराशेजारील नितीन मधुकर भामरे यांना कोमल यांच्या घराच्या बेड रुममध्ये लाईट चालू तर दरवाजा उघडा दिसल्याने नितीन यांनी कोमल यांना फोन करून तुम्ही घरात आहेत का? , लाईट सुरू आहे, अशी विचारणा केली असता परभणी असल्याचे सांगून घरात जाऊन प्रकार काय जाणून घ्या? अशी विनंती केली. त्यानुसार नितीन भामरे व विशाल नेवे असे दोघांनी घरात जाऊन पाहिले असता चोरीचा प्रकार समोर दिसला. बेडरूम मधील लोखंडी कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेला होता. कपाटाचे लॉकर तोडलेले होते. हॉलमधील टी.व्ही. समोरील लाकडी कपाटाचे ड्रावर उघडे दिसले. हा सर्व प्रकार भामरे यांनी फोनवरून कोमल यांना सांगितला. १६ जुलै रोजी सायंकाळी घरी येऊन कोमल यांनी घराची तपासणी केली असता दहा हजाराची रोकड तसेच पाचशे रुपये किंमतीचे पायातील जोडपे लंपास केल्याचे समोर आले. या प्रकरणी तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.