जळगाव प्रतिनिधी । कोरोनामुळे लॉकडाऊन असतांना बेकायदेशीर पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना मुद्देमाल व दुचाकीसह अटक करण्यात शहर पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा कार्यक्षेत्रात सर्व हॉटेल्स, खाद्यपदार्थ यांसह इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले असतांना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास दोन जण दुचाकीवरून जातांना संशायास्पद हालचाली करतांना सानेगुरूजी चौकातील रोडवर दिसून आले. दोघांना शहर पोलीस ठाण्याचे सपोनि दिपक तिवारी, पोना दिपक सोनवणे, पोका प्रणेश ठाकूर यांनी चौकशीसाठी थांबविले. त्यांची चौकशी केली असताना त्यांच्या गोणपाटच्या थैलीत १६ हजार रूपये किंमतीचा केसरयुक्त पानमसाला मिळून आला. संशयित आरोपी योगेश उर्फ गोविंद बाजीराव चव्हाण आणि शशीकांत पंडीत बिऱ्हाडे (वय-४२) दोघे रा. आसोदा ता.जि.जळगाव यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातील पानमसाला आणि २० हजार रूपये किंमतीची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीडी ६९०५) हस्तगत केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांवर लॉकडाऊनचे उल्लंघन, बेकायदेशीर पान मसालाची वाहतूक व विक्री प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निकुंभ करीत आहे.