नवी दिल्ली । एकीकडे कोरोनाच्या प्रतिकारासाठी सर्वत्र अनेकविध उपाय केले जात असतांना कोविड-१९ या विषाणूचा हवेच्या माध्यमातून प्रसार होत असल्याचा खळबळजनक दावा २३९ शास्त्रांच्या एका पथकाने केला आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतचे निकष बदलण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
कोविड-१९ विषाणू हा संसर्गजन्य असून याचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने आधीच स्पष्ट केले आहे. तथापि, याचा प्रसार हवेच्या माध्यमातून होत नसल्याचेही आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. खोकला वा शिंक आल्यानंतर परिसरातील उडालेले कण हे बाहेर येत असले तरी याचा थेट हवेतून प्रसार होत नसल्याचे आधीच जाहीर करण्यात आलेले आहे. तथापि, ३२ देशांमधील २३९ शास्त्रज्ञांच्या एका चमूने केलेल्या संशोधनातून याला छेद देणारा निष्कर्ष समोर आला आहे. यानुसार, कोविड-१९ हा विषाणू हवेतूनही पसरत आहे. यामुळे केवळ सॅनिटायझेशन, फिजीकल डिस्टन्सींग व मास्क लाऊन भागणार नसून याचा नायनाट करण्यासाठी अधिक व्यापक आणि परिणामकारक उपाययोजना आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत आपल्या निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याची मागणी देखील यामध्ये करण्यात आलेली आहे. यामुळे कोंदट वातावरण असलेल्या भागात कोरोनाच्या संसर्गाची जास्त धास्ती असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने काळजी घेण्याबाबतच्या मार्गदर्शन दिशादर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधीत २३९ शास्त्रज्ञ लवकरच आपले संशोधन जाहीर करणार असून त्यांनी आधी एका जाहीर पत्राच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. हे पत्र न्यूयॉर्क टाईम्स व लॉस एंजल्स टाईम्सने प्रकाशित केले असून यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.