चीनला ‘जशास तसे’ उत्तर….सैनिकांना कारवाईची मुभा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । दोन्ही देशांमधील सुमारे ३५०० किलोमीटर अंतराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने आगळीक केली तर भारतीय सैन्यदलास त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची परवानगी देण्यात आली असून संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारत व चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमिवर पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल रात्री वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांशी बैठक घेतली. बैठकीला संरक्षण दलांचे प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख एम. एम. नरवणे, नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग आणि हवाईदलप्रमुख आरकेएस भदौरिया उपस्थित होते. याप्रसंगी चीनला सडेतोड उत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सीमेचे रक्षण करण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात आली असून सशस्त्र दलांना संपूर्ण सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनने कोणतीही आगळीक केल्यास कशाचाही विचार न करता जशास तसे प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सशस्त्र दलांना देण्यात आले आहेत. तसेच, बंदुका न चालवण्याच्या दोन्ही देशांतील १९९६ आणि २००५च्या करारांस भारतीय जवान बांधील राहणार नाहीत, असे गलवान खोर्‍यातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर स्पष्ट करण्यात आल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.

Protected Content