जळगाव प्रतिनिधी । राज्यातील जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रचंड वाढता प्रादुर्भाव बघता जिल्हा परिषदेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकिय अधिकारी व आरोग्य विभागाशी संबंधित विविध पदाची थेट मेगाभरतीला सुरूवात झाली असुन पात्र उमेदवारांची गर्दी झाली आहे. उद्या देखील मुलाखती सुरू राहणार आहे, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे एकुण ५४२ पदासांठी अर्ज मागविले असून आज सकाळच्या ८ वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर इच्छुक उमेदवारांनी फुलून गेला आहे. जरी अनलॉक तिसरा टप्पा सुरू असला तरी जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गचा चढता आलेख आहे. बाजारपेठेत गर्दीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा कमी पडू नये म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने थेट भरतीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये एमबीबीएस, बीएएमएस, नर्सेस स्टाफ, आयुष वैद्यकिय अधिकारी, हॉस्पिटल व्यवस्थापक, एक्स-रे तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ, फार्मसीस्ट, भुलतज्ञ डॉक्टर, डाटा इंन्ट्री ऑपरेटर, औषधी भांडार विभागासह इतर आदी पदांसाठी एकुण ५४२ पदे थेट भरले जाणार असून इच्छुक तरूणांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत आहे. ‘कोणाचे नशिब’ सार्थकी ठरते ही बाब अंतीम यादीवर समजणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
थेट भरती प्रकरणी तरूणांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांसाठी जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते. या भरतीसाठी जिल्ह्यातील भुसावळ, रावेर, चाळीसगाव, पाचोरा यासह ग्रामीण भागातील तरूणांची गर्दी जमली आहे.