मुंबई वृत्तसंस्था । मुंबई महापालिका रुग्णालयाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह चक्क बोरिवली स्टेशनजवळ सापडला. रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धचा थेट मृतदेहच सापडल्याने खळबळ उडाली आहे. याशिवाय यानिमित्ताने मोठा प्रश्न हा आहे की, रुग्णालयातून हे आजोबा बोरिवली स्टेशनपर्यंत पोहोचलेच कसे?
दरम्यान, या वृद्धाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असाही प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.मात्र शताब्दी रुग्णालयाचा प्रकार यापेक्षा वेगळा आहे. या रुग्णालयातून काल पहाटेपासून ८० वर्षीय आजोबा बेपत्ता होते. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने शताब्दी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. काही दिवसापूर्वीच केईएम रुग्णालयातून ७५ वर्षीय कोरोनाबाधित सुधाकर खाडे गायब झाले होते. तब्बल १५ दिवसांच्या शोधानंतर, त्यांचाही मृतदेह सापडला होता. महापालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याच पुन्हा समोर येत आहे.