वॉशिंग्टन वृत्तसंस्था । जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही चीनधार्जिणी असल्याचा आरोप करून यातून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रंप यांनी केली आहे.
डोनॉल्ड ट्रंप यांनी आधीच कोरोनाचा विषाणू हा चीननिर्मित असल्याचा आरोप केला होता. जागतिक आरोग्य संघटना ही चीन सरकारच्या हातचे कळसूत्री बाहुले असल्याचे सांगत त्यांनी या संघटनेला देण्यात येणारा निधी देखील थांबविला होता. यानंतर आता त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली. ते म्हणले की, जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णत: चीनची पकड आहे. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे. सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटना करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचं वर्चस्व आहे, त्याच्या तुलनेत अमेरिकेकडून ४५० दशलक्ष डॉलर्सची मदत केली जात होती. परंतु संघटना आवश्यक त्या सुधारणा करण्यास अपयशी ठरली. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा जो निधी थांबवण्यात आला आहे, तो जगातील अन्य आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले.