धरणगावचे प्रशासकीय अधिकारी जोपासताय माणुसकी धर्म ; कोरोना बाधितांना स्वखर्चाने देताय सकस आहार

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व पालिका कर्मचारी ‘कोरोना’बाधितांची अहोरात्र काळजी घेत आहेत. विशेष म्हणजे प्रांतधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी व नायब तहसीलदार यांनी निधीची वाट न बघता बाधितांची रोग प्रतिकारशक्‍ती वाढून ते लवकर ‘कोरोना’मुक्त व्हावेत म्हणून स्वखर्चाने त्यांना सकस-पोष्टिक आहारासह विविध फळांचा ज्यूस उपलब्ध करून देत विशेष काळजी घेत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या सामाजिक जाणीवेमुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक भारावले आहेत.

 

धरणगावात आतापर्यंत दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ८ जण क्वारंटाईन केलेले आहेत. यामुळे शहरात घाबरण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असली तरी देखील खबरदारी म्हणून प्रशासनाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज झालेली आहे. शहरालगत १०० रुग्णांची व्यवस्था होईल असा कोविड कक्ष उभारण्यात आला आहे. दरम्यान, या कोविड कक्षासाठी अद्याप विशेष निधी उपलब्ध झालेला नाही. परंतू यामुळे रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून प्रांतधिकारी विनय गोसावी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, नायब तहसीलदार श्री. मोहोड हे सर्व प्रशाकीय अधिकारी समाजसेवकांच्या मदतीने कोविड कक्षातील खर्च भागवीत आहेत.

 

धरणगावात आजच्या घडीला १० कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका वृद्ध रुग्ण महिलेचा मृत्यू झाला आहेत. तर कोविड कक्षात स्वतंत्र मजल्यांवर बाधित व क्वारंटाईन केलेल्या लोकांना वेगळे ठेवण्यात आलेले आहे. यात बाधितांची संख्या ९ तर क्वारंटाईन केलेले ८ जण आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर जळगाव सिव्हीलमधील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून या रुग्णांना जळगावला न पाठवता, धरणगावातच ठेवण्याचा निर्णय घेतला. रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. भविष्यात रुग्णांची संख्या वाढल्यास स्वतंत्र कोरोना रुग्ण तात्पुरत्या स्वरुपात उभं करण्यासाठी एक शाळा अधिगृहित करण्यात आलेली आहे.

 

कोविड कक्षातील सर्वाना सकाळी चहा, बिस्कीट, नाश्त्यात पोहे, उपमा तर दुपार आणि रात्रीच्या जेवणात सकस आहार त्यात डाळ-भात, भाजीपाल्यासह इतर पोष्टिक आहार दिला जात आहे. विशेष म्हणजे रुग्णांची रोग प्रतिकारशक्‍ती वाढावी म्हणून मौसबीसह इतर फळांचा ज्यूस देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. आरोग्य विभाग देखील रुग्णांची नियमितपणे तपासणी करत असून औषधी-उपचार करत आहे. मुळात ज्यांची प्रतिकारशक्‍ती कमी आहे, त्यांना लवकर कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता अधिक असते. परंतू यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. बाधित रुग्णांची योग्य काळजी घेतली जात असून लवकरच या बाधित रुग्ण कोरोनामुक्त होतील, असा विश्वास सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Protected Content