यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महेलखेडी येथे लॉकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडाला असून या संदर्भात ग्रामपंचायतीचे सरपंच व पोलीस पाटलांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, सर्वत्र कोरोना या विषाणु आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या वतीने विविध उपायोजना करण्यात आल्या असुन असे असतांना मात्र महेलखेडी ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारा मुळे कोरोना संदर्भातील सोशल डीस्टेन्सिंग सह सर्व नियमांचा फज्जा उडाला आहे. याबाबतची तक्रार लेवापाटीदार फाऊंडेशनचे काशीनाथ सुनिल महाजन यांनी तहसीलदाराकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की आमच्या महेलखेडी तालुका यावल या गांवा मध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर ग्राम पंचायत प्रशासन सरपंच आणी पोलीस पाटील यांच्या वतीने कुठलीही दक्षता घेतली गेलेली दिसुन येत नाही. या महामारीच्या आपातकालीन परिस्थितीत गावात सोशल डीस्टन्स असो किंवा इतर नियम असो त्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. परिणामी बाहेरगावाहुन आलेले नागरीकांसाठी विलगीकरण कक्ष असुन यात देखील विलगीकरण कक्षात सरपच यांच्या ओळखीचे बाहेरगावाहुन आलेले आपल्या घरात व गावात फिरतांना दिसत आहेत. तर ओळखीच्या नसलेल्या नागरीकांना विलगीकरण कक्षात ठेवले जात असल्याने महेलखेडी गावात लॉक डाऊन नाही तर राजकारण खेळले जात असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. दरम्यान, प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी तात्काळ या सर्व प्रकाराची चौकशी करून निर्णय न घेतल्यास येथे कोरोनाचा प्रकोप उदभवण्याची भिती या निवेदनात व्यक्त करण्यात आलेली आहे.
तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना देण्यात आलेल्या लेवापाटीदार फाऊंडेशच्या काशीनाथ सुनिल महाजन यांच्यासह ललीत कपले,प्रविण कपले, भूपेंद्र महाजन, आशिष झुरकाळे, जितेन्द्र पाटील, उमेश पाटील, भिकन पटेल , राजु पाटील, पराग महाजन आणी राजु कपले यांच्या स्वाक्षरी आहेत.