जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार : आज ३० पॉझिटीव्ह; रूग्णांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर

जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात अजून ३० पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यामुळे आता कोरोना बाधीतांची संख्या चारशेच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आज सायंकाळी जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोनाबाबतचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून अपडेट केले आहे. यानुसार-जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून त्यापैकी 78 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील सव्वीस, भुसवाळ येथील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्ण संख्या 381 इतकी झाली असून आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत तर 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव शहरात कोरोनाचा रूग्ण तुलनेत कमी प्रमाणात आढळून येत होते. तथापि, आज एकदम २६ बाधीत आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हादरल्या आहेत. त्यात वाघनगर परिसरातील १५ रुग्ण आहेत. उर्वरित रुग्ण शाहूनगरातील चार, अक्सानगर, मेहरुण प्रत्येकी दोन तर सम्राट कॉलनी, पिंप्राळा, ओंकारनगर, दक्षतानगर, कोविड रुग्णालयातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तर दुसरीकडे आज एक पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने एरंडोल तालुक्यातेही कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचे दिसून आले आहे.

कोरोना अपडेटस (21 मे, 2020)

जिल्ह्यात आजचे स्क्रिनिंग केलेले रुग्ण – 3286
आजचे कोरोना बाधित रुग्ण – 35
आजचे निगेटिव‌ह रिपोर्ट आलेले रुग्ण – 152
आजपर्यंतचे कोरोना बाधित रुग्ण – 381
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – 139
आजपर्यंत मृत्यु झालेले रुग्ण – 44

Protected Content