नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारत सरकारने केलेल्या कारवाईला राजकीय वर्तुळातून जोरदार पाठिंबा मिळत असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलाच्या लढवय्या वैमानिकांना सॅल्यूट ठोकला आहे. राहुल गांधी यांनी याप्रकरणी ट्विट केले आहे.
या कारवाईनंतर भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना माझा सलाम…’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी भारताच्या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे. ‘पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे. त्यामुळे आपण तिथे कधीही बॉम्ब टाकू शकतो. यात काहीही चुकीचे नाही आणि आपण त्यांच्या हद्दीत घुसलो असलो तरी त्याने काही बिघडत नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या नियमांनुसार, प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. पाकिस्तान भारताचे हजार तुकडे करण्याच्या घोषणा करतो. त्यामुळे त्यांच्यावर हजार किलोचे बॉम्ब टाकण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे,’ असे स्वामी म्हणाले.