नाशिक (वृत्तसंस्था) धुळे,नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात आयकर विभागाने टाकलेल्या छापासत्रात तब्बल 180 कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडालेली आहे. दरम्यान, कट प्रॅक्टिसचा गोरखधंदा या मूळ संशयातून ही कारवाई करण्यात आल्याचे कळते.
धुळे,नाशिक आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यात टाकलेल्या छाप्यातडॉक्टर, पॅथॉलॉजी लॅबवरही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. जळगाव येथील कारवाई पूर्ण करून पथक शनिवारी परत गेले होते. परंतु उत्तर महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कारवाई सुरूच होती. गेल्या आठवड्यात या कारवाईला सुरुवात झाली होती. यामध्ये 20 ते 30 डॉक्टरांच्या सुमारे 50 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते. या कारवाईत बेहिशोबी रोख रक्कम, दागिने, कागदपत्रे, आणि मिळकती मिळाल्या आहेत. त्यांची छाननी सुरु आहे. जवळपास 180 कोटींची बेहिशेबी मालमत्तेवर कारवाई केल्याचे कळते. अनेक ठिकाणच्या नोंदीही संशयास्पद आहेत. छाप्यानंतर अनेकांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.