नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्माणाधीन तसेच सवलतीच्या दरातील घरांच्या जीएसटीमध्ये कपात करण्याची महत्वपूर्ण घोषणा आज वित्तमंत्री अरूण जेटली यांनी केली.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी काऊन्सीलची बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषदेत जेटली यांनी यात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. बांधण्यात येत असलेल्या घरांच्या जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. या पार्श्वभूमिवर, आता या प्रकारातील घरांना १२ ऐवजी ५ टक्के जीएसटी लागणार आहे. यामुळे अर्थातच घरे स्वस्त होणार आहे. तर परवडणाऱ्या (अॅफोर्डेबल) घरांवरील जीएसटी ८ टक्क्यांवरून थेट एक टक्का करण्यात आला आहे. बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये ६० चौ. मीटर कार्पेट एरियापर्यंतची घरे परवडणारी मानली जातील तर नॉन मेट्रो शहरात ९० चौ. प्रति मीटरची घरे परवडणारी मानली जातील. या घरांची कमाल किंमत ४५ लाख रुपये असेल. हे नवे दर १ एप्रिल २०१९ पासून लागू होणार आहेत,’ अशी माहिती जेटली यांनी दिली.