जळगाव (प्रतिनिधी) शहरातील चित्रा चौकात असलेल्या नीलम वाईन्सची उत्पादन शुल्क भागाच्या विशेष पथकाकडून आज अचानक तपासणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरातील सर्व वाईन्स शॉपची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ॲड. कुणाल पवार यांनी केली होती. याच अनुषंगाने ही तपासणी सुरु असल्याचे कळते.
आज सकाळी चित्रा चौकात अचानक उत्पादन शुल्क भागाचे पथक पोहचले व त्यांनी नीलम वाईन्सची तपासणी करायला सुरुवात केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याबाबत अधिकची माहिती मिळू शकली नव्हती. लॉकडाऊनच्या काळात शहरातील वाईन्स शॉपच्या सिल असलेल्या गोदामांतील मद्यसाठ्याची तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ॲड. कुणाल पवार यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. एवढेच नव्हे तर, मद्यसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले होते. दरम्यान, तपासणी करणारे पथक नाशिक येथील असल्याचे कळते.