जळगाव, प्रतिनिधी । मागील वर्षी गुलाबी बोंडअळीचा कापुस पिकांवर प्रादुर्भाव झाला होता. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव या खरीप हंगामात होऊ नये यासाठी उपाययोजनाबाबत माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली आहे.
गुलाबीचा बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उन्हाळ्यामध्ये एप्रिल-मे महिन्यात जमिनीची खोल नांगरट करावी. कापुस पिकाची पुर्वहंगामी मे मधील लागवड करू नये. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणा-या बीटी कापुस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करणे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे, कपाशीच्या सभोवती नॉनबीटी (रेफ्युजी) कपाशीची लागवड करणे. नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करुन त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करणे. जिल्ह्यातील जिनींग मिल्समध्ये फेरोमन सापळे लावून मास ट्रॅपिंग करावे असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.