जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू चौकात असणारी सार्वजनीक पाणपोई आज महापालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकार्यांच्या पथकाने जमीनदोस्त केल्यामुळे संतापयुक्त आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत वृत्तांत असा की, सन १९८७ मध्ये सुप्रसिध्द सिनेअभिनेते ग्रेट शोमॅन स्व. राजकपूर यांच्या शुभहस्ते व तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांच्या अध्यक्षतेखाली स्व. महेंद्रकुमार झुंबरलाल सुराणा यांच्या स्मरणार्थ या पाणपोईचे लोकार्पण झाले होते. यानंतर जळगाव मनपा व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ एप्रिल २००८ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी विजय सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन मनपा आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या हस्ते, रमेशदादा जैन (तत्कालीन उप महापौर), शांताराम वाघमारे (तत्कालीन जिल्हा पोलिस अधिक्षक), संजय तापडीया (सीईओ तुलसी पाईप) या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत याचे नूतनीकरण करून लोकार्पण झाले होते. रोटरी तत्कालीन चेअरमन गनी मेमन, सेक्रेटरी नितीन रेदासनी, प्रकल्प प्रमुख विनोद बियाणी या सर्व मंडळींच्या पुढाकाराने सन २००८ पासून आजपर्यंत या पाणपोईची देखभाल तुलसी पाईप तर्फे नियमीत केली जात होती. हजारो लोकांची तृष्णा भागवणारी पाणपोई जमिनदोस्त करण्यात आली.
दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव होत असल्याचा आरोप आधीपासूनच होत होता. यात आज चक्क पाणपोयीच जमीनदोस्त केल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.