नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘काही गोष्टी देशात होऊच शकत नाहीत असं काही वर्षांपूर्वी म्हटलं जायचं. मात्र, देशातील जनतेच्या पाठिंब्याने व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचं चित्र बदलून टाकलंय,’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला.
राजधानीत आयोजित ‘ईटी ग्लोबल बिझनेस समीट’ मध्ये देशानं गेल्या साडेचार वर्षांत केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा पंतप्रधान मोदी यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ‘२०१४ साली अनेक पातळ्यांवर व निकषांवर आपली अर्थव्यवस्था गर्तेत गेल्याचं चित्र होतं. मग ती महागाई असो, चालू खात्यातील तूट किंवा वित्तीय तूट. आर्थिक सुधारणा अशक्य आहेत असा एक समज झाला होता. भारतीय जनतेच्या सहकार्यानं आम्ही तो समज खोडून काढला. गेल्या पाच वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेनं अनेक अंगांनी झेप घेतली आहे. यापूर्वी विकासाचा दर ५ टक्के तर महागाईचा दर १० टक्के होता. मात्र, गेल्या काही वर्षांत महागाई दर ४.५ वर तर विकासदर ७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जीएसटीनं जीडीपीच्या वाढीत मोलाची भूमिका बजावलीय. जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्थेच्या पातळीवर प्रथमच इतकं आश्वासक चित्र निर्माण झालंय’, असा दावाही मोदी यांनी केला.