यावल प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव टाळण्यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी महामंडळाची बस सेवा मागील एक महिन्यापासून पूर्णपणे बंद असल्याने यामुळे यावल एसटी आगारात सुमारे २ कोटी ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे माहितीद्वारे यावल आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल येथील एस.टी. महामंडळाच्या आगारातून कोरोनामुळे लागलेल्या संचारबंदीचे पूर्वी आगारातून प्रतिदिन ६२ बसेस या लांब पल्ल्याची आणि तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील प्रवाशांसाठी सुमारे ७० शेड्युल सोडले जातात. यासाठी ३२५ चालक व वाहक त्याचबरोबर जवळपास ४० ते ४५ इतर कर्मचारी आगारात कार्यरत असून या सर्व दळणवळणच्या माध्यमातून यावल एसटी आगारात दिवसाला सुमारे ७ लाख रुपये उत्पन्न प्राप्त होते. दरम्यान कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने शहरी व ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी एसटी बस कधी नाही एवढी १ महिन्यापासून थांबली असून यामुळे राज्याच्या एस.टी.महामंडळ विभागाला मिळणारे सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न बुडीत निघाले आहे. दरम्यान कोरोनाचा घातक आजार हा लवकरच हद्दपार होऊन संचारबंदी संपेल व आपल्या सर्वांची आवडती लालपरीचे चाक पुन्हा आपल्या गावाकडे धावू लागतील, अशी आशा अपेक्षा यावल आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस व्ही भालेराव यांनी व्यक्त केले आहे.