मालिकेत रावणाचा वध…धरणगाव पालिकेत श्रद्धांजली अन् अमेरिकेत बातमी !

धरणगाव (प्रतिनिधी) लॉकडाऊनमुळे कधीकाळी भारतात सर्वाधिक गाजेलेली रामायण मालिका पुन्हा एकदा दाखवली जात आहे. आज (शनिवार) रोजी रावणाच्या वधाचा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर १९८७-८८ मध्ये धरणगाव पालिकेत घडलेला एक गंमतीशीर किस्सा पुन्हा ताजा झालाय. त्यावेळी मालिकेतील रावणाचा श्रीरामाने वध केल्यानंतर पालिकेत चक्क श्रद्धांजली देण्यात आली होती. विशेष म्हणजे याची बातमी मग भारतासह जगभर विविध दैनिकात प्रकाशित झाली होती.

 

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात सोशल मीडियावर लोकांकडून ८०च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय रामायण मालिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. 1980 च्या दशकात रविवारी सकाळी रामायण सुरू झाले की जवळपास संपूर्ण देश बंद होत असे. रस्त्यांवर सामसूम व्हायची,दुकानं बंद व्हायची आणि लोक आंघोळ करून, टीव्हीला उदबत्ती लावून, हार घालून मग ही मालिका पाहायला बसायचे. या छोट्याशा किस्स्यावरून लक्षात येते की, लोकांच्या मनावर या मालिकेचा किती गारुड स्वार होते.

 

या मालिकेशी निगडीत एक गंमतीशीर किस्सा धरणगाव नगरपालिकेत घडला होता. त्यावेळी जेव्हा मालिकेत रावणाचा वध झाला. त्यावेळी तत्कालीन नगरसेवक एस.पी. कुलकर्णी यांनी पालिकेच्या सभागृहात रावणाला श्रद्धांजली द्यावी, असा ठराव मांडला होता. त्यावेळीचे नगराध्यक्ष डॉ. व्ही.आर.तिवारी यांनी या ठराव मजूर करत, रावणाला श्रद्धांजली दिली होती. त्यावेळी नगरसेवक कुलकर्णी हेच गावकरीचे वार्ताहर होते. त्यानंतर याची बातमी दैनिक गावकरीने प्रसिद्ध केली होती. बघता-बघता ही बातमी संपूर्ण भारतभर विविध भाषेतील दैनिकात प्रसिद्ध झाली होती. युएनआय, पीटीआयनंतर अगदी अमेरिकेतील जगप्रसिद्ध दैनिक वाशिंग्टन पोस्टने देखील ही बातमी प्रकाशित केली होती. तत्कालीन नगराध्यक्ष तिवारी यांचे जावई त्यावेळी अमेरिकेत राहत होते. त्यांनी फोन करून श्री. तिवारी यांना फोन करून याबाबत माहिती दिली होती.

 

आमचे तत्कालीन धरणगावचे वार्ताहर एस.पी.कुलकर्णी यांनी याबाबत बातमी पाठवली होती. त्यावेळी मी गावकरीला उपसंपादक म्हणून कार्यरत होतो. सहज गंमतीशीर बातमी म्हणून आम्ही प्रकाशित केली. परंतु त्यानंतर आमच्या बातमीची दखल चक्क अमेरिकेतील प्रसिद्ध दैनिक वाशिंग्टन पोस्टने देखील घेतली होती. योगायोगाने रामायण मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवरून प्रसारित केली जात आहे. आज रावणाच्या वधाचा भाग बघून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात.

– विभाकर कुरंमभट्टी

 

एका पत्रकारासाठी आपली बातमी जगभर विविध भाषेत प्रकाशित होणे, ही अभिमानाचीच बाब असते. आज रामायण मालिकेत रावणाचा वध बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्यात आणि धरणगावातील तो काळ माझ्या डोळ्यासमोर पुन्हा उभा राहिला.

– एस.पी.कुलकर्णी

Protected Content