जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचे फेरतपासणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जळगाव जिल्हा “कोरोना’मुक्त झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांचा भाग आणि नागरिकांच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवांच्या दुकानांची वेळ सकाळी अकरा ते दुपारी पाच अशी करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडावे. गर्दी करू नये. सोशल डिस्टन्स ठेवावे. यामुळे जिल्ह्यात “कोरोना’चा संसर्ग होणार नाही. जशी सतर्कता आतापर्यंत पाळली, तशीच पुढेही पाळावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना केले.
याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन. एस. चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत दोन कोरोना’ बाधित रुग्ण आढळले होते. त्यातील एकाचा मृत्यू यापूर्वीच झाला आहे. त्याला इतर आजारही होते. तर दुसऱ्या संशयिताचा फेर तपासणीचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तो आता “कोरोना’मुक्त झाला आहे. त्या रुग्णाला आज घरी सोडण्यात आले. आता जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. आतापर्यंत जिल्ह्यात 3732 जणांचे स्क्रिनिंग झाले. 247 जणांचे नमूने तपासणीसाठी पाठविले होते. 228 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले. 15 जणांचे अहवाल पेंडिंग आहे. दोन जणांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत. आता 47 संशयित रुग्ण क्वारंटाईन आहेत. 13 जण नवीन संशयित दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात नागरिकांना वस्तू घेण्यास सोईचे व्हावे यासाठी सर्व किराणा मालाची दुकाने (घाऊक व किरकोळ), भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, रस्त्यावर हातगाडीद्वारा विक्री करणारे फिरते विक्रेते, काही संस्थांद्वारे करण्यात येणारे बाजार कोणत्याही प्रकारे रस्त्यावर अथवा गल्लोगल्ली जाऊन विक्री करणारे विक्रेते यांचे व्यवहार सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेतच सुरू राहतील. दुकानदारांनी या वेळेत शक्यतोवर किराणा, भाजीपाला घरपोच देण्याचे आवाहनही त्यांनी केले. औषधांची दुकानांना वेळेचे बंधन घालण्यात आलेले नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहारही सोशल डिस्टन्स पाळूनच करण्याचे आदेश दिले आहे. जर आदेशाचे पालन झाले नाही तर त्या समित्यांचे व्यवहार बंद केले जातील.
रेशनकार्डावर धान्य मिळण्यासाठी नागरिक रेशन कार्ड घेऊन रेशन दुकान, तहसील कार्यालयात गर्दी करताना दिसतात. नागरिकांनी तसे करू नये. या महिन्याच्या धान्याचे वाटप पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात धान्याचा पुरेसा साठा आहे. ज्यांचे नाव प्राधान्य कुटुंबांच्या यादीत नाहीत, मात्र त्यांच्याकडे केशरी कार्ड आहेत अशांना मे व जून महिन्यात धान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा साठा आहे. कोणीही उपाशीपोटी राहणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे. त्यामुळे नागरीकांनी गर्दी करु नये असे आवाहन त्यांनी नागरीकांना केले. आजच्या स्थितीत जिल्ह्यात कोरोनाचा एकही बाधित रुग्ण नाही. असे असले तरी नागरीकांनी लॉकडाउनचे पालन करुन स्वत:चे, कुटूंबाचे संरक्षण करावे. प्रशासनाने केलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. जेणेकरुन आपला जळगाव जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त राहिल, असेही ते शेवटी म्हणाले.