मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनां साठी मुक्ताईनगर येथे खासदार रक्षाताई खडसे यांनी आढावा बैठक घेतली.
याप्रसंगी तहसीलदार वाडेकर, जि.प. सभापती जयपाल बोदडे, नगराध्यक्षा नजमाताई तडवी उपस्थित होते.
याप्रसंगी बाहेरून आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे निर्देश देर्यात आले. रेशनिंग च्या संदर्भात चर्चा झाली, सोशल डिस्टन्स पाळून रेशन वाटप करण्यात यावे. मुक्ताईनगर मधील लोकसंख्या १ लाख ६५ हजार असून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पुढील २ दिवसात सुमारे १ लाख २५ लोकांना धान्य वाटप करण्यास सुरुवात होईल. केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीच्या दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला, आणखी ३५ हजार लोकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली. त्या पुढे म्हणाल्या की, गोरगरिबांना अन्नधान्याची अडचण होऊ नये म्हणून धान्याचे वितरण सुरळीत राहावे यासाठी पुरवठा विभागाने दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकही नागरिक रेशन धान्य मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. जर कोणा रेशन दुकानदारांची तक्रार आल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल.
पंतप्रधान मोदीनी २१ दिवस संचारबंदी जाहीर केली असून राज्य सरकार व प्रशासनास सहकार्य करून कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून विनंती करण्यात आली. प्रत्येकाने काळजी घेतली तर कोरोना फैलावणार नाही, खबरदारी म्हणून प्रत्येक वार्डात व गावात औषध फवारणी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सरकारच्या सूचनांचे पालन करून अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणाला शंका असेल तर आरोग्य अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.