मुंबई (वृत्तसंस्था) मोदी सरकारला कोरोनाशी लढण्यासाठी १५ हजार कोटींचा निधी जमा करायचा आहे. त्याहून जास्त निधी नव्याने स्थापन झालेल्या पंतप्रधानांच्या ‘केअर’ खात्यात जमा झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्राच्या निधी उभारणीचा हिशेबाच्या पार्श्वभूमीवर हिशोब मांडला आहे. ‘केंद्राने खासदारांचे पगार कापले. त्यातून सालाना ६०-७० कोटी रुपये सरकारच्या हातावर पडणार आहेत. संसद निधी बंद केल्यामुळं त्यात आणखी सुमारे एक हजार कोटींची भर पडेल. टाटा, अंबानी, प्रेमजी, बजाज अशा उद्योगपतींकडून पाचेक हजार कोटी रुपये जमा झाले आहेत,’ असा दावा शिवसेनेने केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा उल्लेख शिवसेनेने आवर्जून केला आहे. नेहरूंनी स्थापन केलेले सार्वजनिक उपक्रम आणि कंपन्यांकडून म्हणजे पेट्रोलियम, स्टील कंपन्यांकडून सात हजार कोटी रुपये जमा झाल्याचे म्हटले आहे.
खासकरून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवरून शिवसेनेने मोदी सरकारला घेरले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. मात्र हिंदुस्थानात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती त्याप्रमाणात खाली आलेल्या नाहीत. या व्यवहारातून मोदी सरकारला झालेला निव्वळ नफा २० लाख कोटी इतका आहे. या नफ्यातील किती हिस्सा कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात वापरला जात आहे?. तसेच करोनाविरुद्धच्या लढ्यासाठी केंद्र सरकारनं आता तरी परदेशातून काळा पैसा आणावा अशी मागणी, करण्यात आली आहे.