कोरोना विरोधात भारतीय लष्कराचे ऑपरेशन नमस्ते अभियान

नवी दिल्ली, वृत्तसेवा । देशावर कोरोनाचे संकट आले असून या विरोधात भारतीय लष्कर सज्ज झाले आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन नमस्ते अभियान सुरू करत करोनाविरुद्ध युद्ध छेडले आहे.

कोरोनाच्या संकटांशी सामना करण्यासाठी सर्व लष्करी अधिकारी आणि जवानांच्या सुट्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे. अशाच प्रकारे सन २००१ मध्ये पराक्रम अभियानाच्या वेळी ८ ते १० महिन्यांच्या कालावधीत कुणालाही सुट्टी देण्यात आलेली नव्हती, अशी माहिती भारताचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली. पराक्रम अभियानावेळी देखील आम्हाला विजय मिळाला होता. आता नमस्ते अभियानदेखील यशस्वी होणार असा ठाम विश्वासही लष्करप्रमुखांनी व्यक्त केला. भारतीय लष्कराची संस्थात्मक रचना आणि प्रशिक्षणाच्या बळावर अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करणे शक्य होते, असेही नरवणे म्हणाले. कोविड-१९ शी लढताना आम्ही याच क्षमतांचा वापर करू असे ते म्हणाले. कोरोना विषाणूशी सुरू झालेल्या लढाईत सरकार आणि सामान्य प्रशानाला मदत करणे ही आमची जबाबदारी आहे असेही लष्करप्रमुख म्हणाले. एक लष्करप्रमुख या नात्याने सैन्यदलाला फीट ठेवणे माझी जबाबदारी आहे. देशाच्या रक्षणासाठी आम्हाला स्वत:ला सुरक्षित आणि फीट राखणे अत्यंत महत्वाचे आहे. हेच लक्षात घेत आम्ही गेल्या काही आठवड्यांमध्ये एका आठवड्यात २-३ अॅडव्हाझरी जारी केली आहे, असेही ते पुढे म्हणाले. मागील सर्व अभियानांमध्ये लष्कराला यश मिळाले होते आणि आता या नमस्ते अभियानामध्येही आम्ही नक्कीच यशस्वी होऊ, असे नरवणे म्हणाले.

Protected Content