नाशिक (वृत्तसेवा) दिंडोरी तालुक्यातील धाऊर या गावी सिलेंडरचा स्फोट होऊन कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली आहे.
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चौधरी कुटुंब झोपलेले असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की संपूर्ण घर जळून खाक झाले. विशेष म्हणजे सिलेंडरचेही दोन तुकडे होऊन ते घराबाहेर फेकले गेले. या घटनेत मुरलीधर हरी चौधरी आणि कविता मुरलीधर चौधरी या दाम्पत्यासह त्यांचा मुलगा तुषार मुरलीधर चौधरी आणि पुतण्या नयन कैलास चौधरी यांचा मुत्यू झाला आहे. चौधरी यांच्या घरात दिवा लावलेला होता, त्या दिव्याची ठिणगी पडली आणि गॅस सिलेंडर लिकेज असल्यामुळे स्फोट झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.