चोपडा तालुक्यात गारपिटीमुळे नुकसान

चोपडा प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये आज सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पावसाचा फटका बसला असून यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाल्याची भिती आहे.

शहरासह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तापी नदीच्या काठावरील गावांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेत जास्त होते. तर अनेक गावांमध्ये गारपीट झाली. यात प्रामुख्याने गोरगावले गावाला याचा मोठा फटका बसल्याचे वृत्त आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने याचा शेतीवर विपरीत परिणाम होणार आहे. आधीच खरीप हंगाम हा अतिवृष्टीने वाया गेला असतांना आता रब्बीचा हाता-तोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिसकावून घेतला जाणार की काय या भितीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. दरम्यान, अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली असून बर्‍याच ठिकाणी वीज गेल्याचे वृत्त आहे.

Protected Content