मुंबई प्रतिनिधी । राज्यातील शहीदांच्या पत्नीसाठी मालमत्ता करामध्ये सवलत देणारी योजना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आणण्याची घोषणा अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली.
राज्याच्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा विधान परिषदेत झाली. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रबिंदू मानून मांडला आहे. राज्यातील शहीद झालेल्या सैनिकांच्या पत्नीसाठी मालमत्ता करामध्ये सवलत देणारी योजना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आणली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. तर जलयुक्त शिवार योजनेमध्ये केलेल्या तपासणीत पुण्यामधील संस्थेने दिलेल्या अहवालामध्ये या योजनेमध्ये असलेल्या त्रुटी आणि अनियमिततेबद्दल तेथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे या योजनेची पुनर्रचना करून जलसंधारणाची सर्वसमावेशक योजना आणली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारण्यासाठी आराखडा तयार करून त्यासाठी पाच कोटी रुपये निधी देण्याचे देसाई यांनी जाहीर केले.