मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान मोदी हे सोशल मीडिया सोडणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज शिवसेनेने यावरून जोरदार हल्लाबोल करत या सर्व प्रकरणामुळे भाजपच्या सायबर फौजांचा प्राण तळमळला असल्याची खोचक टीका केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याची केलेली घोषणा आणि यानंतर यावरून केलेल्या घुमजावबाबत आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, आपले पंतप्रधान मोदी हे अभिनयनिपुण आहेत. त्यामुळे ते कधी कोणती नाटयछटा सादर करतील याचा नेम नाही. मोदी यांनी लागोपाठ दोन दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळया ट्विटमुळे असेच नाटय निर्माण झाले. पण नंतर हा सस्पेन्स खुद्द मोदींनीच संपुष्टात आणला. ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आपले सोशल मीडियावरील अकांऊट एका दिवसासाठी महिलांना समर्पित करण्याची घोषणा करून मोदींनी आपल्याच पहिल्या ट्विटमधील हवा काढून घेतली आणि मोदी सोशल मीडियातून संन्यास घेणार नाहीत हे स्पष्ट झाले. वास्तविक सोशल मीडिया हा तर भारतीय जनता पक्षाचा पंचप्राणच! २०१४ चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली. भाजपच्या सायबर फौजेचे सेनापती नरेंद्र मोदी हेच मैदान सोडून निघून जात आहेत, असा संदेश पंतप्रधानांच्या कालच्या ट्विटमुळे गेला किंवा तो जाणीवपूर्वक तसा जाऊ दिला गेला. त्यावरून चर्चेचे घमासान सुरू झाल्यानंतरही लगेच खुलासा न करता चर्वितचर्वणाचा प्रयोग रंगू दिला गेला. नाटय पुरेसे रंगले आहे हे ध्यानात आल्यानंतर नवा क्लायमॅक्स पुढे करून धक्का देण्याचे तंत्र खुबीने वापरले गेले असेच आता म्हणावे लागेल.
यात पुढे नमूद केले आहे की, सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच. मोदींच्या दोन्ही ट्विटवरून आता सोशल मीडियातही विनोदनिर्मिती सुरू झाली आहे. सोशल मीडियाचा वापर हा एक छंद आहे. स्त्रीयांना नटण्या-मुरडण्याची हौस असते. कुणाला छानछोकीची हौस असते, कुणाला उत्तम खाण्यापिण्यात आनंद मिळतो. तसा मोदी यांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात आनंद मिळत असतो. सोशल मीडियाचे व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच! वास्तविक सोशल मीडियाचा सकारात्मक वापरही करता येतो हे अलीकडे रतन टाटांसारख्या लोकांनी दाखवून दिले. एका सफाई कामगाराच्या मुलाची व्यथा टाटा यांनी सोशल मीडियातून लोकांसमोर आणली. सोशल मीडियात असे कामही होते. त्यामुळे सोशल मीडिया सोडण्याच्या काही तासांच्या अफवेऐवजी मोदी यांनी टाटांचा मार्ग स्वीकारावा. पण तसे केले तर त्यांच्या सायबर योद्धयांचे काय होईल? फौजा तर शेवटी पोटावरच चालतात आणि आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे त्या फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे. काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल, पण फौजेला आता नवे काम मिळाले आहे. काही तासांच्या अफवेचा एवढाच अर्थ असल्याचा टोला यात मारण्यात आला आहे.