औरंगाबाद (वृत्तसंस्था) यापुढे रस्त्यावरील खड्ड्यांची नागरिकांनी तक्रार केल्यानंतर १० दिवसांत संबंधित विभागाने ते खड्डे बुजवायचे आहेत, तसे झाले नाही तर तीन दिवसांत पोलिसांनी शहानिशा करून गुन्हे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित विभागांत प्रचंड खळबळ उडाली आहे. वकील रुपेश जैस्वाल यांच्या जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
औरंगाबाद शहरातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. मात्र महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग कुणीही दखल घेत नाही. परंतू आता रस्त्यावर खड्डे दिसल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांची नागरिकांनी तक्रार केल्यानंतर १० दिवसांत संबंधित विभागाने ते खड्डे बुजवायचे आहेत, तसे झाले नाही तर तीन दिवसांत पोलिसांनी शहानिशा करून गुन्हे दाखल करावे, असेही आदेश पोलिसांना दिले आहेत. नागरिकांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर देण्यात यावे. तसेच ट्वीटरवरून तक्रार करता येणार आहे. दरम्यान, औरंगाबाद महापौर नंदकुमार घोडेले यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.