चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी. रावळ आणि त्यांच्या सहकार्यांनी आपत्कालीन जनजागृतीचे धडे दिले.
जिल्हाधिकारी यांच्या आपत्ती व्यवस्थापन जनजागृती प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम २०१९ -२०२० च्या नियोजित मंजूरी आराखड्यानुसार जिल्ह्यातील तालुकानिहाय निवडक शाळांमध्ये शालेय सुरक्षा व आपत्कालीन रंगीत तालीम( मॉकड्रील)या विषयाबाबत प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन चोपडा तालुक्यातील निवडक शाळा विवेकानंद विद्यालयात करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी.रावळ यांच्यासह त्यांचे सहकारी वन्यजीव रक्षक उपाध्यक्ष सतीश कांबळे, योगिता श्रीवास्तव, आकाश चौधरी, अक्षय राजनकर, चेतन बोरनारे, गोपाळ रंधळे यांनी शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद यांची आपत्कालीन स्थितीत काय करायला हवे,काय नको याचे प्रात्यक्षिकासह कार्यशाळा घेतली.
भूकंप परिस्थितीत अलाम वाजल्यानंतर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे वर्ग सोडत पटांगणावर धाव घ्यायची व स्वतःचे व इतरांचे प्राण कसे वाचवायचे यासाठी मॉक ड्रील घेण्यात आले. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दोन मिनिट सहा सेकंदात शालेय इमारत रिकामी करत पटांगणावर इयत्तेनुसार एकत्रित आले. काही विद्यार्थी दोरीच्या साह्याने चक्क तिसर्या मजल्यावरून प्रशिक्षणानंतर खाली आलीत तर काहींनी दोरीचे स्ट्रेचर बनवले,कृत्रिम श्वास देऊन दाखविला,आग विझवण्याची झरीी प्रक्रिया करून दाखविले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रमुख उपशिक्षक जावेद तडवी, अनिल शिंपी उपस्थित होते त्यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिक आणि कार्यशाळा घेतल्यामुळे मान्यवरांचे स्वागत सत्कार करून आभार मानले. सूत्रसंचालन उपशिक्षक पवन लाठी तर छायाचित्रण कलाशिक्षक राकेश विसपुते यांनी केले.