मुंबई प्रतिनिधी । फडणवीस सरकारच्या कालखंडात सुरू करण्यात आलेल्या महापोर्टलला बंद करण्यात येणार असून याच्या जागी सक्षम प्रक्रिया उभारण्यात येणार आहे. या संदर्भात आज परिपत्रक जाहीर करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, महापोर्टलद्वारे सरकारी भरती करण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. मात्र, त्यात अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी परीक्षार्थींकडून करण्यात आल्या होत्या. महापोर्टल बंद करण्याची मागणीही अनेकदा करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारकडं यासंबंधी पाठपुरावाही केला होता. अखेर महापोर्टल बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. त्यासंबंधीचं परीपत्रक आज सरकारच्या वतीनं काढण्यात आलं आहे. यानुसार महापोर्टल बंद करण्यात येणार असून याच्या जागी नवीन प्रक्रिया अंमलात येणार आहे. महाआयटीच्या माध्यमातून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकिया राबविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सामग्री नाही. यामुळे एकापेक्षा जास्त सर्व्हीस प्रोव्हायडर घेऊन नवीन प्रणाली उभारण्यात येणार असून याच्याच माध्यमातून भविष्यात परीक्षा घेतल्या जाणार आहेत.