हिंगणघाट, वृत्तसंस्था । महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या येथील जळीतकांडातील पीडितेने आज सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. पीडित तरुणीच्या मृत्यूनंतर आता तिच्या अंत्यसंस्कारासाठी जळगावहून येणाऱ्या भावाची प्रतिक्षा केली जात आहे. पीडित तरुणीचा भाऊ जळगाव येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे.
आज सकाळी बहिणीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तो वर्ध्याला येण्यासाठी जळगावहून निघाला आहे. परीक्षा असल्या कारणाने भाऊ जळगाव येथे थांबला होता. वर्ध्याला ट्रेन पोहोचायला संध्याकाळचे चार वाजतील. वर्ध्याला उतरल्यानंतर पीडितेच्या भावाला तिथून गावापर्यंत नेण्यासाठी प्रशासनाने गाडीची व्यवस्था केली आहे. येथील एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे यानं तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला.